उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena In Uttar Pradesh and Goa Election) अत्यंत निराशाजनक कामगिरी करताना दिसते आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये शिवेसेनेने (Shiv Sena) मोठा गाजावाजा करत उमेदवार रिंगणात उतरवले होते. तसेच, पक्षाचा स्टार चेहरा असलेल्या आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र, असे असूनही शिवसेनेला दोन्ही राज्यांमध्ये पाय रोवता आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना दोन्ही राज्यांमध्ये मोठे यश मिळवेल असा दावा केला होता. मात्र, हा दावा कोणत्याही प्रकारे वास्तवात उतरताना दिसत नाही.
गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. ही निवडणूक इतिहास बदलणारी असेल असा दावाही शिवसेनेने केला होता. मात्र, गोवा असो की उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी जनतेने शिवसेनेला स्वीकारले नाही असे दिसते. मतमोजणीचा सुरुवातीचा कल हाती आला तेव्हा दोन्ही राज्यांमधील कोणत्याही जागेवरुन शिवसेना उमेदवाराला खाते उघडता आले नाही. काही ठिकाणी तर शिवसेना उमेदवाराला झालेले मतदान नोटापेक्षाही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राबाहेर हातपाय पसरणाऱ्या शिवसेनेला हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.