Assam Floods: असम मधील काजीरंगा नॅशनल पार्क, बोकाहाट टायगर रिझर्व्हच्या काही भागात पुर परिस्थिती निर्माण झाल्याने 68 जनावरांचा बळी
Assam Flood (Photo Credits-ANI)

असम येथे मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बहुतांश नागरिकांची घरे पाण्याखाली गेली असून त्यांना ती सोडावी लागली आहेत. असम येथे होणाऱ्या पावसामुळे प्रत्येक वर्षी अशीच परिस्थिती उद्भवते. आतापर्यंत पुरामुळे 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 जिल्ह्यातील 53 लाखांहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला आहे. याच दरम्यान आता काजीरंगा, टायगर रिझर्व्ह (बोकाहाट) येथील राज्यातील काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने 96 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

असम सरकारने याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, काजीरंगा, टायगर रिझर्व्ह (बोकाहाट) मधील काही भागात पुर आला आहे. त्यामुळे या पुरात 8 गेंडे, 3 वन्य म्हशी, 7 रानडुक्कर, 3 सारंग हरिण, 74 सांबर आणि 2 सुंदरींचा मृत्यू झाला आहे. तर काजीरंगा येथील अन्य जनावरांचा बचाव करण्याचे कार्य सुरु आहे.(असम: मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गुवाहाटी येथील गावात पुर परिस्थिती)

दरम्यान, असम येथे मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदीचे पाणी गुवाहाटी येथे असलेल्या गावात शिरल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. असम येथील पुराची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुरामुळे फटका बसलेल्या पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच असम येथील नागरिक हिंमतीने या परिस्थितीचा सामना करत असल्याचे ही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने सुद्धा असम मध्ये आलेल्या पुराकडे तातडीने लक्ष द्यावे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राज्यातील पुराची परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये जागृकता आणि लोकांचे पुर्नवसन करण्यासाठी इंडिया फॉर असम नावाची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील निधीतून असमच्या नागरिकांची मदत केली जाणार आहे.