Asaram Bapu (Photo Credit: Facebook)

आसाराम बापूला (Asaram Bapu) मोठा दिलासा देत, सर्वोच्च न्यायालयाने त्याला 2013 च्या बलात्कार प्रकरणात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर केला. अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आसाराम बापू पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आपल्या अनुयायांना भेटणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. माहितीनुसार, 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव स्वयंघोषित संत आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  नुकतेच 17 दिवसांचा पॅरोल संपल्यानंतर आसाराम बापू सहा दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात परतला होता.

आसाराम बापूच्या जोधपूर आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट 2013 मध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जोधपूर येथील विशेष एससी/एसटी न्यायालयाने आसाराम बापूला लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवले होते. 31 ऑगस्ट 2013 पासून तो तुरुंगात आहे. आसाराम बापूवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते.

जोधपूर आणि पुढे गांधीनगरमध्येही 2013 मध्ये बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. जोधपूरजवळील मनाई गावात असलेल्या त्याच्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील रहिवासी असलेली ही मुलगी आश्रमात विद्यार्थिनी होती. याशिवाय आसाराम बापूला गांधीनगर न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आसारामला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पीडितेसोबत बलात्काराची घटना 2001 ते 2006 दरम्यान घडली. (हेही वाचा: Kerala Shocker: केरळमध्ये 11वीच्या विद्यार्थिनीवर शिकवणी शिक्षकाकडून बलात्कार; न्यायालयाने सुनावली 111 वर्षांची शिक्षा)

आसाराम गेल्या साडेअकरा वर्षांपासून तुरुंगात आहेत. आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो सुरत तुरुंगात बंद आहे. दरम्यान, शिक्षेपूर्वी आसाराम बापूहा लोकप्रिय धर्मगुरू होता. 1970 च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर आपला पहिला आश्रम सुरू केल्यानंतर आसाराम बापूने अनेक कोटींचे व्यवसाय साम्राज्य उभे केले.