केरळमधील (Kerala) एका विशेष जलदगती न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका शिकवणी शिक्षकाला 111 वर्षांची सश्रम कारावास आणि 1.05 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दंड न भरल्यास दोषी मनोज (44) याला एक वर्षाची अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. आपल्या निकालात न्यायाधीश आर रेखा यांनी सांगितले की, मनोज, जो मुलीचा पालक देखील होता, त्याने असा गुन्हा केला आहे ज्यासाठी कोणत्याही दयेची आवश्यकता नाही. महत्वाचे म्हणजे, पती अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचे समजल्यानंतर मनोजच्या पत्नीने आत्महत्या केली होती.
माहितीनुसार, ही घटना 2 जुलै 2019 रोजी घडली होती. फिर्यादीनुसार, आरोपी हा सरकारी कर्मचारी असून तो त्याच्या घरी शिकवणी वर्ग चालवतो. त्याने मुलीला स्पेशल क्लासच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केला, तसेच मोबाईलमध्ये फोटोही काढले. या घटनेनंतर मुलगी घाबरली आणि तिने शिकवणी वर्गात जाणे बंद केले.
यानंतर आरोपीने घटनेचे फोटो व्हायरल केले. याची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी फोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर आरोपीला अटक केल्यानंतर, त्याचा फोन जप्त करण्यात आला आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला, ज्यामध्ये बाल शोषणाच्या प्रतिमा उघड झाल्या. फोनमध्ये मुलीवर अत्याचार होत असल्याची छायाचित्रे आढळली. (हेही वाचा: Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण)
मात्र, घटनेच्या दिवशी आपण आपल्या कार्यालयातच होतो, असा दावा मनोजने केला होता. परंतु मनोजच्या फोन रेकॉर्डवरून खटला सिद्ध करण्यात फिर्यादीला यश आले. फिर्यादीने सादर केलेल्या आरोपीच्या फोनच्या कॉल रेकॉर्डवरून मनोज घटनेच्या दिवशी शिकवणी शिकवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला 111 वर्षांची शिक्षा सुनावली गेली.