Tajinder Bagga Posters | (Photo Credit: Twitter)

रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना महाराष्ट्र पोलिसांनी काल (बुधवार, 4 ऑक्टोबर 2020) अटक केली. त्यानंतर भारतीय जनता पक्ष भलताच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह ते देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) इमारतीसमोरही पोस्टर झळकले आहे. भाजपचे तेजींदर बग्गा (Tajinder Bagga) नामक नेत्याने हे पोस्टर झळकावले असून, त्यावर 'आणीबाणी 0.2' (Emergency 2.0) असा उल्लेख केला आहे. कनॉट प्लेस (Connaught Place) येथेही असे पोस्टर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र सदन इमारतीसमोर लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा आहेत. एकमेकांविरुद्ध दिशेला तोंड करुन असलेल्या प्रतिमांखाली 'आणीबाणी 2.0' असा उल्लेख आढळतो. एका संकेतस्थळाशी बोलताना तेंजींदर बग्गा यांनी म्हटले आहे की, आम्ही महाराष्ट्र सदन बाहेर पोस्टर्स लावले आहेत. ज्या पद्धतीने 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीबद्दल आम्ही ऐकले होते. त्याच पद्धतीने आता पत्रकारांना तुरुंगात टाकले जात आहे. आणीबाणी प्रमाणेत उद्धव ठाकरे सरकार काम करत असल्याचा आरोप बग्गा यांनी केला आहे. (हेही वाचा, Arnab Goswami Arrest Case: अर्नब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

तेजींदर बग्गा यांनी या आधीही दिल्ली येथे अनेकदा पोस्टर्स झळकवले आहे. बग्गा यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथील चीनी दुतावासाबाहेर पोस्टर्स झळकवली होती. या पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी तैवानला शुभेच्छा दिल्या होत्या. चीनी दुतावासाबाहेर झळकवलेल्या पोस्टर्समध्ये 'तैवान हॅप्पी नॅशनल डे, 10 ऑक्टोबर' अशी अक्षरे होती.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अलिबाग कोर्टासमोर हजर केले. या वेळी न्यायालयाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, अर्नब गोस्वामी यांच्या वकीलांनी जामिन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज (5 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.