असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या अमूल्या लियोना हिला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी
Amulya Leona (Photo Credits ANI)

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणारी मुलगी अमूल्या लियोना (Amulya Leona) हिच्या  विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून तिला 14 दिवसांची न्यायालयिन कोठडी सुनवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, अमूल्या लियोना हिला परप्पना अग्रहारा येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नावाच्या संस्थेकडून तिला आमंत्रित करण्यात आले होते.  एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असताना या तरुणीने मंचावरुन 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. अखेर पोलिसांनी तिला मंचावरुन हटवले.  यामुळे एकच गोंधळ उडाला असला तरी असदुद्दीन ओवैसी मात्र या तरुणीचा आपल्या पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. (असदुद्दीन ओवैसी यांच्या CAA विरोधी रॅलीत महिलेने दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल)

ओवैसी म्हणाले की, "माझा किंवा माझ्या पक्षाचा या तरुणीशी कोणताही संबंध नाही. आयोजकांनी तिला आमंत्रित करुन चूक केली. मला याची कल्पना असती तर मी येथे आलोच नसतो. आम्ही भारतासाठी आहोत आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत शत्रू देशाचे समर्थन करणार नाही. आमचे पूर्ण आंदोलन भारताला एकसंघ ठेवण्यासाठी आहे."

ANI ट्विट:

"अमूल्याचे व्यक्तव्य अत्यंत चुकीचे असून अशाप्रकारचे वागणे सहन केले जाणार नाही. मी तिला अनेकदा समजावून देखील तिने माझे ऐकले नाही," अशी प्रतिक्रीया अमूल्या हिच्या वडिलांनी दिली आहे.

याच दरम्यान भाजपचे आयटी सेल चे प्रमुख अमित मालवीय यांनी अमूल्या लियोनाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अमूल्या म्हणते की, मी एक चेहरा आहे याच्यामागे पूर्ण टीम आहे. 21 जानेवारीचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमुळे यामागे कोणता मोठा डाव तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.