Ammonia Gas Leak From Kota Fertilizer Factory (फोटो सौजन्य - PTI)

Ammonia Gas Leak From Kota Fertilizer Factory: राजस्थानमधील कोटा (Kota) येथून मोठी बातमी येत आहे. चंबळ खत रासायनिक कारखान्यातून अमोनिया वायू गळती (Ammonia Gas Leak) झाली असून या वायूच्या संपर्कात आल्यानंतर एका सरकारी शाळेतील 15 मुले बेशुद्ध पडली. या 15 मुलांपैकी 7 मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, खत रासायनिक कारखान्याची हद्द शाळेला लागूनच असून गॅस गळती झाल्यानंतर गॅस शाळेपर्यंत पोहोचला. काही वेळातच मुले बेशुद्ध पडू लागली. मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गॅस गळतीमुळे एकूण 15 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी पाच जणांना सुरुवातीला कोटा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नंतर कोटा येथील जेके लोन रुग्णालयात हलवण्यात आले. चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल्स लिमिटेड (सीएफसीएल) कारखान्यात सकाळी 11 वाजता गॅस गळती झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वाचा -Gas Leak in Pune: पिंपरी चिंचवड येथे गॅस गळतीमुळे स्फोट, 5 जण जखमी, पाहा व्हिडीओ)

कारखान्यात विषारी वायूची गळती झाल्याने उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले, ज्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. सीएफसीएल ही युरिया खत तयार करणारी कारखाना आहे. (वाचा - Ambernath Gas Leak: अंबरनाथमध्ये गॅस गळती; नागरिकांना डोळ्यांची जळजळ अन् श्वास घ्यायला त्रास, परिसरात भितीचे वातावरण)

सुरुवातीला पीडित विद्यार्थ्यांवर प्रथम कारखान्याच्या परिसरात चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही विद्यार्थिनी पाणी आणण्यासाठी शाळेच्या आवारात गेल्या असताना त्यांना गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटू लागले. विषारी वायूमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. यासंदर्भात माहिती मिळताचं कोटा जिल्हाधिकारी रवींद्र गोस्वामी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारखाना आणि उपविभाग प्रशासनाकडून माहिती गोळा केली.