राज्यसभा सदस्य आणि भारतीय राजकारणातील चर्चित चेहरा अमर सिंह (Amar Singh) यांनी आझमगढ (Azamgarh) येथील आपली वडिलोपार्जित संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आपले मूळ गाव असलेल्या तरवां येथील सुमारे 12 कोटी रुपयांचे घर आणि जमीन ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संबंधीत राष्ट्रीय सेवा भारती (Rashtriya Seva Bharati) या संस्थेला दान करणार आहेत. ही संपत्ती हस्तांतरीत करण्यासाठी अमर सिंह हे लालगंज तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी पोहोचले व या संपत्तीचे हस्तांतरण केले. या वेळी राष्ट्रीय सेवा भारती संघटन मंत्री ऋषिपालसिंह ददवाल उपस्थित होते. या जमिनीची किंमत 12 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमर सिंह यांच्या या संपत्तीचे सरकारी मुल्यांकन हे २ कोटी ९१ लाख ५५ हजार रूपये असल्याचे लालगंज तहसीलचे उपनिबंधक सुनीलकुमार यांनी म्हटले आहे.
लालगंज तहसील कार्यालयात रजिस्ट्री केल्यानंतर अमरसिंह हे आपल्या गावी पोहोचले. अमर सिंह यांचे निकटवर्तीय वीरभ्रद प्रताप सिंह यांनी सांगितले की, पहिल्यांदा ही जमीन भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर अमरसिंह यांनी 12 कोटी रुपयांची ही संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. ही जमीनराष्ट्रीय सेवा भारतीकडे सुपूर्त करण्यात आली. ही संस्था अमर सिंह यांचे वडील दिवंगत हरश चंद्र सिंह उर्फ ठाकुर हरीश चंद्र सेवा केंद्राच्या नावाने शाळा आणि इतर सामाजिक उपक्रम राबवेल. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यार्थ ही जमीन दान करत असल्याचे अमरसिंह यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना CREDAI राहत्या शहरात देणार 2BHK फ्लॅट्स)
राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी म्हटले होते की, लालगंज तहसील निबंद कार्यालयात 20 फेब्रुवारीला येऊन ते जमीनीचे हस्तांतरण राष्ट्रीय सेवा भारतीकडे करतील. या जमीनीवर ठाकुर हरीश चंद्र सेवा केंद्राची स्थापना होईल. अमर सिंह हे 23 फेब्रुवारी रोजी कानपूर येथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आरएसएसचा हा अत्यंत खासगी कार्यक्रम असल्याची माहिती आहे.