उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मेरठ (Meerut District) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका डॉक्टरला तांत्रिकाने चक्क 'अल्लाउद्दीनचा दिवा' (Aladdin Ka Chirag) दाखवून 2.5 कोटी रुपयांना फसवले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून काही दिवे आणि नकली साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, खैरनगर येथील डॉ. लाईक खान हे फिजीशन आहेत. त्यांनी आपले शिक्षण एफआरएचएस लंडन येथून पूर्ण केले आहे. बागपथ येथील एक महिला सन 2018 मध्ये डॉ. लाईक खान यांच्या संपर्कात आली होती. समीना असे या महिलेचे नाव आहे. ती शस्त्रक्रियेसाठी डॉ. खान यांच्याकडे आली होती. त्यानंतर काही काळाने ही महिला नियमीत या डॉक्टरांकडे येऊ लागली.
डॉ. लाईक यांनी पोलिसांना महिती देताना सांगितले की, या महिलेने इस्लामुद्दीन नावाच्या एका तांत्रीकाशी त्यांची ओळख करुन दिली. त्याने डॉक्टरांवर प्रभाव टाकत अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा देण्याचे अमीश दाखवले. त्या बदल्यात त्यांच्याकडून 2.5 कोटी रुपयांचा व्यवहार ठरवला. या व्यवहारापोटी अडवान्स म्हणून 75 लाख रुपये घेतले. (हेही वाचा, मुंबई: पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून व्यवसायिकांची फसवणूक; टोळी गजाआड)
डॉ. लाईक खान यांनी दावा केला आहे की, ते संबंधित तांत्रिकाच्या इतके प्रभावाखाली आले की त्यांनी तो दिवा विकत घेतला. परंतू, जेव्हा त्यांनी त्याचा वापर करुन पाहिला तेव्हा मात्र त्यातून काहीच हाती आले नाही. तो दिवा म्हणजे केवळ नकली खेळणे असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली.