Akash Anand Political Successor Of Mayawati: बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख नेत्या मायावती (Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद (Akash Anand) यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये निवडणूक प्रचारात पक्षाचा प्रमुख चेहरा राहिलेले 28 वर्षीय आकाश आनंद सध्या पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक (National Coordinator of BSP) म्हणून काम करतात. लोकसभा खासदार दानिश अली (Danish Ali Suspend) यांना बसपमधून निलंबित केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडलेल्या पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
कांशिराम यांच्याकडून राजकीय वारसा
बसपाचे संस्थापक कांशिराम यांच्याकडून राजकीय वारसा आणि उत्तराधिकारी पद घेतलेल्या मायावती या घराणेशाहीच्या विरोधक सुरुवातीपासूनच राहिल्या आहेत. घराणेशाहीच्या राजकारणावर दीर्घकाळ टीका करणाऱ्या नेत्यांपैकी एक अशीही त्यांची देशभरात ओळख आहे. दरम्यान, मायावती यांनी पक्षातील नेतृत्वात महत्त्वाचा बदल आणि जबाबदारी सोपवत असताना आकाश आनंद यांची राजकीय वारसदार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मायावती यांच्यावरही घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. (हेही वाचा, Mayawati On Gyanvapi Case: ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे वक्तव्य - धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे)
आकाश आनंदचा राजकारणातील प्रवेश
मायावती यांनी त्यांचे बंधू आनंद कुमार यांची BSP चे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून 2019 मध्ये नियुक्ती केली होती. त्या वेळीही त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र आता आकाश आनंद यांच्या अधिकृत पदामुळे पक्षाच्या नेतृत्व रचनेत एक धोरणात्मक बदल म्हणून पाहिले जाईल. ज्याची राजकीय वर्तुळात प्रदीर्घ चर्चा होत राहील. आकाश आनंदचा राजकारणातील प्रवेश 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान झाला. ज्यामध्ये त्यांनी प्रमुख म्हणून सक्रिय भूमिका बजावली. बसपाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मायावती यांच्या अनेक सभांना आनंद यांनी उपस्थिती दर्शवली होती.
आकाश आनंद अल्प परिचय
आकाश आनंद हा मायावती यांच्या भावाचा मुलगा आहे. जो त्यांना नात्याने भाचा लागतो. सध्या ते बसपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी बसपचे प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रियपणे योगदान दिले. दलित, धार्मिक अल्पसंख्याक, ओबीसी आणि आदिवासींशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून पक्षाच्या निवडणूक प्रचाराची तयारी आणि प्रारंभ करण्यासाठी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून मायावतींनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.
कोण आहेत मायावती ?
मायावती (कुमारी) या भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या चार वेळा माजी मुख्यमंत्री आहेत. त्या बहुजन समाज पक्षाच्या (BSP) राष्ट्रीय अध्यक्षा आहेत, ज्याचा उद्देश वंचित आणि मागासलेल्या जातींचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांना मदत करणे आहे. त्या भारतातील पहिल्या महिला अनुसूचित जातीच्या मुख्यमंत्री तसेच देशातील सर्वात तरुण महिला मुख्यमंत्री आहेत. कांशिराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाजवादी पार्टीच्या त्या प्रदीर्घ काळ प्रमुख आणि सर्वेसर्वा राहिल्या आहेत.