टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा पालघरजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काही रस्ते अपघातांसाठी सदोष प्रकल्प अहवालांना जबाबदार धरले. यासोबतच महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे यावर भर दिला. या पार्श्वभुमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देत आहे.
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) अत्यंत वाईट आहेत आणि ते रस्ते अपघातांना जबाबदार आहेत.’ डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. याबाबत ते म्हणाले की, सुरुवात इथून करण्याची गरज आहे. ही गोष्ट सुधारली नाही तर, तुमचे नुकसान होईल. मंत्री पुढे म्हणाले की, नवीन मर्सिडीज कार देखील अकुशल ड्रायव्हरच्या हातात अडचणी निर्माण करू शकते.
गडकरींनी रस्ते प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची कारणे शोधण्यावर भर दिला कारण विलंबामुळे बांधकामाचा वाढता खर्च ही देखील चिंतेची बाब आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) च्या अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या वर्षी अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या उच्च पातळीवर पोहोचली आहे, तर जखमींची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. (हेही वाचा: Accident In Ahmednagar: अहमदनगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, 2 जागीच ठार, एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू)
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये संपूर्ण भारतात 1.55 लाखांहून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. त्यानुसार दररोज आणि दर एका तासाला सरासरी 426 जणांना जीव गमवावा लागला आहे.