अहमदनगर सोलापूर मार्गावर (Ahmednagar Solapur Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) सोमवारी (5 सप्टेंबर) दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यूमुखी पडला. मांदळी गावाजावळ मालट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. रस्त्यावर अडथळेही आहेत. असे असूनही या मार्गावर वाहने वेगाने हाकली जातात. परिणामी अपघाताच्या घटना घडताना दिसतात.
अहमदनगर सोलापूर मार्गावर सोमावारी झालेला अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन निखळले. कारमध्ये बसलेले तीन तरुण वेगाने बाहेर फेकले गेले. यात तिघांचाही मृत्यू झाला. शरद शोभाचंद पिसाळ (वय ३२), निळकंठ रावसाहेब माने (वय ३४) व धर्मराज लिंबाजी सकट (वय २७ तिघे रा. थेरगाव, ता. कर्जत) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, St Bus Accident At Dapoli: एसटी बसची दापोली वळणावर समोरासमोर धडक, 25 प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती गंभीर)
अधिक माहिती अशी की, नगर सोलापूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना संबंधितांनी काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. हे सर्व तरुण आपल्या कारने मिरजगावकडून मांदळीच्या दिशेने निघाले होते. याच वळी समोरुन येणाऱ्या मालट्रकने या कारला धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. ट्रकची धडक बसताच कार दुभाजकावर आदळली. त्यामुळे कारचे इंजिन निखळले. कारमधील सर्व तरुण बाहेर फेकले गेले.