पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येनंतर पंजाबमध्ये गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंजाबमधील आणखी एक गायक मनकिरत औलख (Mankirt Aulakh) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे या गायकाचा हात असून त्याने त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंजाबचे डीजी व्हीके भवरा यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील कारण जुने वैमनस्य आणि गँगवॉर सांगितले आहे.
अशाप्रकारे पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या निधनानंतर या प्रकरणामध्ये एक नवीन नाव जोडले गेले आहे. गँगस्टर गोल्डी ब्रारने रविवारी या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर दोन दिवसांत याचा बदला घेऊ, असे गँगस्टर दविंदर बंबीहा ग्रुपने सांगितले. सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स टोळीने निरपराधांची हत्या केल्याचा आरोप बंबिहा गटाने केला आहे. बंबिहा ग्रुपने मूसेवालाच्या हत्येमागे गायक मनकिरत औलखचा हात असल्याचे सांगितले आहे.
मुसेवालाच्या हत्येनंतर दविंदर बंबीहाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात म्हटले आहे की, लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांनी मुसेवाला यांची हत्या करून चूक केली आहे. या हत्येत गायक मनकिरत औलखचा पूर्ण हात आहे. तो सर्व गायकांकडून पैसे गोळा करतो. तसेच तो गायकांची वैयक्तिक माहिती लॉरेन्सला देतो असाही आरोप करण्यात आला आहे. (हेही वाचा: गुजरातमधून अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी, 29 वर्षांपासून होते फरार)
घडल्या प्रकारानंतर बंबिहा गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये टक्कर होऊ शकते. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स टोळीने घेतली आहे. लॉरेन्स गँग आणि त्याचा साथीदार कॅनेडियन गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी सांगितले आहे की, मोहालीमध्ये हत्या झालेल्या विकी मिड्डूखेडाच्या हत्येचा आम्ही बदला घेतला आहे. त्याचवेळी आता बंबीहा टोळी समोर आली असून, मुसेवालाच्या हत्येचा आम्ही बदला घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.