
महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) मोठी कारवाई करत दक्षिण भारतीय अभिनेत्री (South Indian Actress) रान्या राव (Ranya Rao) हिस केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) अटक केली. अभिनेत्री सोने तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय होता. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, डीआरआयने (DRI) केलेल्या कारवाईत तिच्याकडे तब्बल 14.2 किलो तस्करीचे सोने सापडले. ती दुबई येथून विमानतळावर आली होती. धक्कादायक असे की, अभिनेत्री एका आयपीएस अधिकाऱ्याची सावत्र कन्या आहे. आयपीएस अधिकारी रामचंद्र राव (IPS Officer Ramachandra Rao) हे तिचे सावत्र वडील आहेत.
डीआरआयची कारवाई, तब्बल 12.56 कोटी रुपयांचे सोने जप्त
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, डीआरआय अधिकाऱ्यांना रान्या राव हिच्या तस्करीच्या कथित गुन्ह्यांबद्दल पूर्वसूचना मिळाली होती. 3 मार्च रोजी संध्याकाळी 7.00 वाजताच्या सुमारास ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने आली तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला बंगळुरु विमानतळावर अडवले. झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना तिच्या शरीरात लपवलेले सोन्याचे बिस्किट सापडले, ज्याची किंमत अंदाजे 12,56 कोटी रुपये आहे. अटकेनंतर, मंगळवारी संध्याकाळी विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यापूर्वी तिची बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाने तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. (हेही वाचा, Mumbai: गुप्तांगातून सोन्याची तस्करी करणाऱ्या 3 महिलांना मुंबई विमानतळावरून अटक)
डीआरआयकडून अभिनेत्रीच्या निवासस्थानी छापा
अधिकाऱ्यांनी सुरु केलेला तपास केवळ विमानतळावर थांबला नाही. रावच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी बेंगळुरूमधील तिच्या लावेल रोड निवासस्थानी छापा टाकला, जिथे ती तिच्या पतीसोबत राहते. झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांनी 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली, ज्यामुळे जप्त केलेली एकूण मालमत्ता 4.73 कोटी रुपयांवर पोहोचली. (हेही वाचा, मुंबई: चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला विमानतळावरुन अटक)
‘माणिक्य’ आणि ‘पताकी’ सारख्या कन्नड चित्रपटांमध्ये भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या रान्या रावने व्यवसायासाठी दुबईला प्रवास करत असल्याचा दावा केला आहे. तथापि, डीआरआय अधिकारी आता आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करी नेटवर्कशी तिचे संबंध तपासत आहेत. या घटनेने कन्नड चित्रपट उद्योगात खळबळ उडाली आहे. तिचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याने प्रशासकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे आणि अधिकारी तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या संभाव्य साथीदारांचा शोध घेत आहेत.