आजकाल महिलांवरील अत्याचारांच्या, हिंसाचारांच्या घटना आणि ज्या प्रकारे असे कृत्य घडत आहे त्याबाबत ऐकल्यावर अक्षरशः काळीज पिळवटून जाते. निर्भयानंतर अशा कितीतरी घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बदायूंच्या (Badaun) कादर चौक पोलिस स्टेशन परिसरातील सिक्री गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा पती घरात नसल्याचे पाहून शेजाऱ्याने तिच्या घरात प्रवेश केला. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने या गोष्टीला विरोध केला तेव्हा तरूणाने आधी तिला जबरदस्तीने अॅसिड पिण्यास भाग पाडले आणि नंतर चाकूने तिचे पोट फाडले.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला जिल्हा रूग्णालयात दाखल केले, मात्र पिडीतेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला बरेली येथे रेफर करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी अॅसिड हल्ल्यासह प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कादर चौक पोलिस स्टेशन परिसरात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. गावातील एका 30 वर्षाच्या महिलेचा नवरा दिल्लीत काम करतो. ही महिला आपल्या तीन मुलांसमवेत घरात एकटीच राहते. रात्री उशिरा शेजारील तरुण सत्येंद्र महिलेच्या घरात घुसला आणि तिची छेडछाड करण्यास सुरवात केली, ज्याला तिने विरोध केला. त्यानंतर संतप्त आरोपीने महिलेला अॅसिड पिण्यास भाग पाडले ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. यावेळी महिलेने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जवळच ठेवलेल्या चाकूने सतेंद्रने तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी फरार होता. (हेही वाचा: उत्तर प्रदेश: हमीरपूर येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; पीडित मुलीच्या तोंडात लोखंडी पाना घालून केली हत्या)
महिलेचा ओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. परिसरातील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी ताबडतोब महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच तिला बरेली येथे पाठविण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेला गंभीरपणे घेतले नाही. मात्र जेव्हा जखमी महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी सत्येंद्रविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सीओ उझानी संजय कुमार रेड्डी गावात पोहोचले व संपूर्ण माहिती गोळा केली गेली.