उत्तर प्रदेश: हमीरपूर येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; पीडित मुलीच्या तोंडात लोखंडी पाना घालून केली हत्या
File Image (Representational Image)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हमीरपुर येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. एवढंच नाही तर बलात्कारानंतर या पीडित मुलीच्या तोंडात लोखंडी पाना घालून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे हमीरपुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना 20 मार्च रोजी फाशी दिली. ही घटना ताजी असतानाचं उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हमीरपूर येथील चिकासी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यानंतर तिची निघृण हत्याही केली आहे. पीडिता घरात एकटी असताना तिच्यावर हा अत्याचार करण्यात आला आहे. (हेही वाचा - कोई रोड पर ना निकले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला कोरोनाचा अर्थ; 24 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

प्राप्त माहितीनुसार, पीडितेचे आई-वडील शेतात काम करत होते. ते घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर नराधन फरार झाले आहेत. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.