Parbhani: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 60 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

Parbhani: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 60 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्यावर 35 हजार रुपयांचं कर्ज होतं. तसेच अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचं मोठ नुकसान झालं होतं. त्यामुळे कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विषेश म्हणजे या भागात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली होती. रामभाऊ बहिरट असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गाजवळच्या पाचेगांव शिवारातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बहिरट यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी स्वतःच्या शेतामधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या कुटुंबियांनी रामभाऊ यांनी आत्महत्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समजलं. त्यानंतर गावातील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. (हेही वाचा -Pune: विनामास्क गाडी चालकाला अडवल्याने पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; गाडी अंगावर घालून बोनेटवरून नेले (Watch Video))

दरम्यान, रामभाऊ यांच्या मुलाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामभाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे बहिरट कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दोन्ही नेत्यांनी परभणी जिल्ह्यातील विविध गावांची पाहणी केली होती. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी पाचेगाव येथील पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली होती.