सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची 'या' कारणांमुळे हकालपट्टी
CBI प्रमुख आलोक वर्मा (Photo credits: PTI)

सीबीआय (CBI) संचालक आलोक वर्मा (Alok Verma) यांची पुन्हा नियुक्ती करत मोदी सरकारला मोठा झटका दिला होता. परंतु अवघ्या 48 तासाच्या आतमध्येच वर्मा यांना पदावरुन दूर केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आलोक वर्मा संतप्त झाले असून त्यांच्यावरील कारवाई ही विरोधातील एका व्यक्तीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे होत असल्याचे मत मांडले आहे. तर या पाच कारणांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे.

1. रेल्वेच्या 2 हॉटेलच्या कंत्राट प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आलोक वर्मा यांच्यावरही आरोप लावण्यात आलेले आहेत. तसेच ठोस पुरावे नसतानाही वर्मा यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणातून वाचवले आहे.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालातील मुद्द्यांचा आधार घेत वर्मा यांच्याकडून पद काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मोईन कुरेशी संबंधित प्रकरणात सतीश बाबू सनाकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आलोक वर्मांवरील हा आरोप सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. (हेही वाचा-सीबीआय अध्यक्ष आलोक वर्मा यांना पदावरून हटवले; पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचा निर्णय)

3.हरयाणा येथे एका जमिन घोटाळ्याप्रकरणी वर्मा यांच्यावर आरोप लावण्यात आलेले होते. त्यामुळे निवड समितीने हा मुद्दा गंभीर धरुन ठेवला. या घोटाळ्यामध्ये 36 कोटी रुपयांचा सौदा झाला होता.

4.सीबीआयमध्ये वादग्रस्त अधिकाऱ्यांना घेतल्याचा आरोप वर्मांवर करण्यात आला आहे. तसेच या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप असूनही वर्मा त्यांच्यासाठी आग्रही होते.

5.विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्मांच्या पदावरून उचलबांगडी करण्याला विरोध दर्शवला होता मात्र पंतप्रधान आणि न्यायमूर्ती ए.के.सिकरी यांनी वर्मांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यामुळे वर्मांची उचलबांगडी 2-1 अशा फरकाने करण्यात आली.