सीबीआय अध्यक्ष आलोक वर्मा यांना पदावरून हटवले; पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचा निर्णय
अलोक वर्मा (Photo credits: PTI)

नवी दिल्ली : सीबीआय (CBI)मध्ये चाललेला वाद अजूनच चिघळत असल्याचे दिसून येत आहे. आलोक वर्मा (Alok Verma) आणि सीबीआयमधील विशेष संचालक राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांच्यातील वादामुळे अलोक वर्मा यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अलोक वर्मा यांना रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द ठरवत, पुन्हा एकदा त्यांना CBI चे संचालक पद देऊ केले. मात्र आता परत एकदा अलोक वर्मा यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या सिलेक्शन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआय प्रमुखपदावरून हटवून वर्मा यांची केंद्रीय अग्निसुरक्षा विभागात महासंचालकपदावर पाठवणी करण्यात आली आहे.

आज (गुरुवारी) नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्याच निवासस्थानी अलोक वर्मा यांचे भविष्य ठरवण्यासाठी काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खडगेदेखील सामील होते. मल्लिकार्जुन यांनी वर्मा यांना अजून एक संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर वर्मा यांनी बुधवारी पुन्हा एकदा आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला होता. त्यानंतर लगेच राव यांनी या दोन महिन्यांच्या काळात केलेल्या बदल्या त्यांनी रद्द ठरवल्या होत्या. वर्मा यांच्या रजेच्या या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये एम. नागेश्वर राव यांनी हे पद सांभाळले होते. (हेही वाचा : आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवणं चूकीचं – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका)

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील, वर्मा यांच्या रजेच्या मुद्यावरून सरकारवर तोफ डागली होती. राफेलच्या मुद्यावरूनच नरेंद्र मोदी सीबीआय प्रमुखांना हटवण्याची घाई करत असल्याचे ट्वीट राहुल गांधी यांनी केले होते.