PUBG (Photo Credit: File Photo)

मध्य प्रदेश: PUBG या ऑनलाईन गेमसाठी आजवर अनेकांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना आपण सर्वांनीच ऐकल्या आहेत, मात्र तरीही आश्चर्य म्हणजे तरुणांच्या मनातील या खेळाचे क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. वास्तविक पाहता हा खेळ आबालवृद्ध सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनला आहे. याचे उदाहरण म्हणजे अलीकडे पबजी खेळातील एक मिशन पूर्ण करण्यासाठी मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील चार अल्पवयीन मुलांनी स्वतःच्याच घरातील 1  लाख रुपये चोरून पळण्याचा प्रताप केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील एक मुलगी 15 आणि दुसरी अवघ्या 13 वर्षांची आहे. तर एक भाऊ 11 वर्षांचा, तर दुसरा अवघ्या 9 वर्षांचा आहे. पोलिसांनी या चौघांना पकडून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. पतीच्या 'Pubg' खुळापायी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

वाचा काय होत नेमकं प्रकरण ?

TOI च्या वृत्तानुसार, या पळून गेलेल्या मुलांना पबजी खेळताना एकच लाइफलाइन उरल्यावर खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी 500 किलोमीटर अंतर पार करण्याचे टार्गेट दिले गेले होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी ही मुले रविवारी रात्री घरातील सर्व जण झोपले असताना गुणा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेली. तेथून त्यांनी ट्रेन पकडली. मुले घरात नसल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सर्वत्र शोधलं, सोबतच घरातील 1  लाख रुपयेही गायब असल्याचं देखील त्यांना समजलं. सर्वत्र शोध घेऊनही मुलं सापडली नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांमध्ये मुलांबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता गुणा गावापासून अंदाजे 250 किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात सापडली, अशी माहिती पोलिसांना मिळाली. प्रवासादरम्यान या मुलांनी दोन हजार रूपये खर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं.  PUBG Game ठरला जगात सर्वाधिक कमाई करणारा गेम; जाणून घ्या किती कोटी कमावले

पोलिसांना सांगितलं हे कारण

ग्वाल्हेर स्थानकात पोलिसांना ही मुले सापडल्यावर त्यांनी प्राथमिक चौकशी केली, ज्यामध्ये मुलांनी आपण पबजी मिशन पूर्ण करण्यासाठी नाही, तर ग्वाल्हेर येथे मॉल बघण्यासाठी गेलो होतो, असं सांगितलं. या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने त्यांची मॉल बघायची इच्छा घरच्यांनी लगेच पूर्ण केली असती. त्यामुळं ही मुलं मॉल पाहण्यासाठी घरातून पळून गेली असतील यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, असं गुणा पोलीस अधीक्षक राहुल लोढा यांनी सांगितलं.

दरम्यान पोलिसांनी मुलांना आईवडिलांकडे सुपूर्त केलं असून मुलांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे, तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या संगोपना, आपली मुले डिजिटल हरवून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असा सल्ला देखील पोलिसांकडून देण्यात येत आहे