Tirupati Laddus Row: सनातन धर्माचे जगप्रसिद्ध आणि सर्वात मोठे केंद्र असलेल्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीची भेसळ होत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर अयोध्येतही खळबळ उडाली आहे. कारण, राम मंदिराचे (Ram Mandir) मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांनी दावा केला आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभात (Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) 300 किलो लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले होते.
आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली गेली असेल तर ते अक्षम्य आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्राणप्रतिष्ठा समारंभात प्रसाद म्हणून किती लाडू आणण्यात आले होते याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला असेल. प्राप्त माहितीनुसार, रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी श्री व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने एक लाखाहून अधिक लाडू पाठवले होते. मात्र, हे प्रसाद म्हणून वाटण्यात आले की नाही याबाबत राम मंदिर ट्रस्टकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. (हेही वाचा -Ram Nath Kovind On Tirupati Laddus Row: 'हे हिंदू धर्मात पाप केल्यासारखे आहे'; तिरुपती मंदिर प्रसाद वादावर रामनाथ कोविंद यांची प्रतिक्रिया)
राम मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने सांगितले की, राम लल्लाच्या अभिषेक समारंभात प्रसाद म्हणून फक्त वेलचीचे दाणे वाटण्यात आले. राम मंदिर ट्रस्टच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख यजमान म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. तसेच या समारंभाला सुमारे 8000 मान्यवरांनी हजेरी लावली होती. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, आम्ही भक्तांना प्रसाद म्हणून फक्त वेलचीचे दाणे वाटले होते. मी माझ्या आयुष्यात एकदा 1981 मध्ये तिरुपतीला गेलो होतो. या वादावर भाष्य करणे माझ्यासाठी योग्य नसल्याचंही राय यांनी यावेळी म्हटलं. (हेही वाचा -Tirupati Laddus Row: तिरुपतीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी? लाडू वादात, राजकारणही तापले)
दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, तिरुपती मंदिराचा लाडू प्रसाद हा केवळ अयोध्येतीलच नव्हे तर देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा प्रकरणांमुळे सनातनींच्या भावना दुखावल्या जातात. भारताच्या धार्मिक वारशावर हा हल्ला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.