खुशखबर! दसऱ्याआधी 1 कोटी कर्मचाऱ्यांना मिळू शकते मोठे गिफ्ट; सरकार महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

सध्या केंद्र सरकारच्या (Central Government) एक कोटी कर्मचार्‍यांना तसेच पेन्शनधारकांना त्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीची प्रतीक्षा आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे व केंद्र सरकार लवकरच आनंदाची बातमी देईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, सरकारी कर्मचार्‍यांचा (Government Employees) महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. मात्र, यामध्ये एक समस्या उद्भवू शकते ती म्हणजे निवडणुका. सध्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections) येऊ घातल्या आहेत. त्यामुळे महागाई भत्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

केंद्र सरकारमध्ये 1.1 कोटी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आहेत. आज जर का महागाई भत्त्याच्या वाढीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, तर त्याचा फायदा या लोकांना सर्वात जास्त होऊ शकतो. या लोकांचा महागाई भत्ता तब्बल 5 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सरकारने जर का हा निर्णय लागू करायचा निर्णय घेतला, तर 7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा पगार  900 रुपयांवरून वाढून दरमहा 12500 रुपये होईल. जानेवारी ते जून 2019 दरम्यान एआयसीपीआयचे आकडे वाढले आहेत. जूनचा डीए 17.09 टक्के होता जो डिसेंबरच्या तुलनेत 5 टक्क्यांहून अधिक आहे. (हेही वाचा: खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ; 7 व्या वेतन आयोगावर भत्ता लागू)

उल्लेखनीय म्हणजे, जानेवारी 2019 पासून केंद्र सरकारने डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. आता पुन्हा एकदा दसऱ्याच्या आधी केंद्र सरकार डीए वाढ जाहीर करत आहे. यापूर्वी मार्च आणि सप्टेंबर महिन्यात याची घोषणा केली गेली होती. या घोषणेमुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 3 वर्षातील सर्वात मोठा फायदा होईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 12 टक्के आहे आणि नुकतीच यात  3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.