Karnataka Hijab Row: हिजाबविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या, कलम 144 लागू
Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

Karnataka Hijab Row: हिजाबवरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता परिस्थिती हिंसाचारापर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा (Shivamogga) येथे 23 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यानंतर येथे तणावाची परिस्थिती असून कलम 144 लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष असे या तरुणाचे नाव असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता (Bajrang Dal Worker) होता. राज्याचे गृहमंत्री अरगा जनेंद्र यांनी पुढील दोन दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 4 ते 5 तरुणांनी हर्षची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेमागील कोणत्याही संघटनेचे नाव अद्याप समोर आलेले नाही. सध्या शिवमोग्गा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेच्या विरोधात काही लोकांनी निदर्शने केली आहेत. जिल्ह्यातील सीगेहट्टी भागात अनेकांनी काही वाहने जाळली, ती विझवण्याचे काम सुरू आहे. हिजाबच्या वादामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. आता या घटनेने त्यात आणखी वाढ झील आहे. (वाचा - Hijab Row: हिजाब घालणे इस्लाम धर्मात अनिवार्य नाही, कर्नाटक हायकोर्टात सरकारने मांडली बाजू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर तणाव वाढला. शिवमोगा शहरातील अनेक भागात दंगल झाली असून वाहने जाळण्यात आली. पोलिस या प्रकरणाला हिजाब वादाशी जोडण्याचा विचार करत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी तरुणाने फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने हिजाबला विरोध करत भगव्या गमछाचे समर्थन केले होते. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बजरंग दलचा हिजाबला विरोध -

कर्नाटकातील उडुपीच्या कॉलेजवरून सुरू झालेल्या वादाने आता आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केले आहे. त्याचवेळी, कर्नाटकातील कोपा येथील स्कारी शाळेत विद्यार्थ्यांनी भगवा गमछे परिधान करून हिजाबचा निषेध केला. शाळेच्या प्रशासनाने भगवा परिधान करण्यास परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी बजरंग दल खूप सक्रिय आहे. बजरंग दलाचे कर्नाटक संयोजक सुनील केआर यांनी याला जिहाद म्हटले आहे. त्याचवेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनेही केली.

हिजाबच्या वादाची झळ बॉलिवूडपर्यंत पोहोचली -

हिजाबचा वाद आधी राजकारणापर्यंत पोहोचला आणि आता बॉलिवूडमध्येही त्याची एन्ट्री झाली आहे. माजी अभिनेत्री झायरा वसीमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल पोस्ट करत हिजाबचे समर्थन केले आहे. तिने लिहिलं की, हा केवळ छंद नसून अल्लाहने दिलेली जबाबदारी आहे. जी लोकांना पूर्ण करायची आहे. झायरा म्हणाली, मी देखील एक महिला आहे आणि हिजाब घालते. कोणाच्याही धार्मिक परंपरांवर बंदी घालता येणार नाही.