Mahakumbh Magh Purnima 2025

Mahakumbh Magh Purnima 2025: माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर भाविकांनी चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या शुभमुहूर्तावर लाखो भाविक गंगेत स्नान करण्यासाठी आले आहेत. भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करत आहेत. माघ पौर्णिमेची तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू झाली असून 12 फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांना संपणार आहे. महाकुंभाच्या या महत्त्वाच्या पर्वासाठी कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ येथील आपल्या कार्यालयातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मेळाव्याच्या स्थळावर स्वत: लक्ष ठेवून आहेत. रात्रीपासून भाविकांनी पवित्र गंगा स्नान करण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. माघी पौर्णिमेनिमित्त हेलिकॉप्टरमधून गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. देशभरात माघ पौर्णिमेचा दिवस उत्साहाने  साजरा केला जात आहे.

येथे पाहा, पोस्ट 

हेलिकॉप्टरमधून भाविकांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. दरम्यान, अप्पर फेअर ऑफिसर विवेक चतुर्वेदी यांनी सांगितले की, आज माघी पौर्णिमेचे स्नान आहे. यावेळी जत्रेत अनपेक्षित गर्दी जमली आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पौष पौर्णिमेपासून (१३ जानेवारी २०२५) सुरू झालेला महाकुंभ हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, ज्यात जगभरातील भाविक येतात. हा भव्य सोहळा २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.

प्रयागराजचे डीआयजी वैभव कृष्ण यांनीही माघ पौर्णिमेच्या स्नानासाठी भाविकांच्या आगमनाची माहिती देताना सांगितले की, माघ पौर्णिमेनिमित्त येथे मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत. "आमची तयारी खूप चांगली आहे भाविक नियमांचे पालन करत आहेत" भाविकांच्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने या भागात 'नो व्हेइकल' झोन जाहीर केला आहे. खासगी आणि सार्वजनिक वाहने ठराविक पार्किंग मध्ये पार्क केली जातील आणि केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना प्रवेश दिला जाईल.