Delhi Shocker: लज्जास्पद! दिल्लीत लिव्ह इन पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Shocker: देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. बुधवारी याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अंकित यादव (वय, 29) असे आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये राहत होता. अंकितविरुद्ध बुरारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आई घरात नसताना पीडितेवर बलात्कार -

पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६ आणि ५०६ आणि ६ पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, ती अंकितसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती, जो कॉन्ट्रॅक्टवर बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तिने 8 वर्षांपूर्वी आपल्या पतीला सोडले होते. पूर्वीच्या नातेसंबंधातून तिला 3 मुले आहेत. (हेही वाचा -Dombivli Rape Case: पोलीस असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोंबिवली येथील घटना)

दरम्यान, 23 जुलै रोजी ही महिला मुलांना घरात सोडून रुग्णालयात गेली होती. अंकितने तिच्या गैरहजेरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रिपोर्ट्सनुसार, अंकितने याआधीही अनेक वेळा मुलीसोबत गैरवर्तन केले होते. (हेही वाचा - Buldhana Gang Rape: बुलढाण्यात आठजणांनी महिलेवर केला बलात्कार; आरोपी 45 हजार घेवून फरार, परिसरात खळबळ)

तथापी, अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेच कायदेशीर कारवाई करण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले आहे. सीआरपीसी कलम १६४ अन्वये पीडितेची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.