Kerala Wayanad Landslide

CPI(M) MLA Donate One Month Salary to CMDRF: भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान, केरळच्या सीपीआय(एम) आमदाराने शनिवारी त्याचा एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीत देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सीपीआय(एम) आमदार त्याचा एका महिन्याचा पगार म्हणजे 50,000 रुपये मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीमध्ये देणार आहे. असे एनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या शनिवारी 358 वर पोहोचली आहे. अद्याप तेथे बचावकार्य सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि कोसळलेल्या घरांखाली अडकलेल्यांना काढण्यासाठी तेथे रडारचा वापर केला जात आहे.

बचाव कार्याला चालना देण्यासाठी केरळ सरकारने केंद्राला प्रगत शोध उपकरणे पाठवण्याची विनंती केली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नॉर्दर्न कमांडचे एक झेव्हर रडार आणि दिल्लीतील तिरंगा माउंटन रेस्क्यू ऑर्गनायझेशनचे चार रीको रडार शनिवारी हवाई दलाच्या विमानाने वायनाडला नेण्यात आले. (हेही वाचा:Wayanad Landslide Death Toll: वायनाडमध्ये भूस्खलनात मोठी जीवितहानी; मृतांचा आकडा 358 वर, बेपत्ता नागरिकांचा रडारच्या मदतीने शोध )

200 हून अधिक अद्याप बेपत्ता

अद्याप वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. पाचव्या दिवशीही तेथे शोध कार्य सुरू आहे.अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी असंख्य स्वयंसेवकांसह बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. मेपाडी भागात भूस्खलन झाले असून याचा फटका मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही देखील बसला. त्यामुळे शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.

राहुल गांधींची 100 घरे बांधण्याची घोषणा 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी वायनाडला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केरळमधील वायनाड येथे भूस्खलनासारखी विनाशकारी घटना कधीच पाहिली नसल्याचे त्यांनी म्हटले. वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसाठी काँग्रेस100 हून अधिक घरे बांधेल, अशी घोषणाही राहूल गांधींनी केली.

भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असंख्य कुटुंबे विस्थापित झाली आहेत आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि बाधित झालेल्यांना मदत देण्यासाठी सुरू असलेले बचाव प्रयत्न महत्त्वाचे आहेत.