Jammu Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत जैश कमांडर जाहिद वानीसह 5 दहशतवादी ठार
Jammu & Kashmir (Photo Credit - Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, त्यांनी गेल्या 12 तासांत दोन ठिकाणी लष्कर-ए-तौयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा (Security Forces Killed 5 Terrorists) केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये (Pulwama) 4 तर बडगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बडगाममध्ये दहशतवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणतात, 'गेल्या 12 तासांत झालेल्या दोन चकमकीत पाकिस्तान प्रायोजित प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे 5 दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्यांमध्ये जैश कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. हे आमच्यासाठी मोठे यश आहे.

दहशतवाद्यांच्या ताब्यातून AK-56 रायफल केली जप्त

बडगाममधील तिलसर, चरार-ए-शरीफ येथे रात्री 10 वाजता सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त गस्तीने शोध सुरू करताच, एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर जवानांनी स्वत:ला वाचवत प्रत्युत्तर दिले. चकमकीत तीन दहशतवादी लपल्याचीही माहिती आहे. मध्यरात्रीनंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. त्याच्याकडून AK-56 रायफलही जप्त करण्यात आली आहे. (हे ही वाचा Kashmir: जम्मू-काश्मीरमधील हसनपोरा येथे दहशतवादी हल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहीद)

गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांना मिळाले यश

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. घटनास्थळावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले. मारले गेलेले दहशतवादी लश्कर-ए-तौयबा च्या रेझिस्टन्स फ्रंटचे होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या किलबाल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. ते म्हणाले की, कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.

या चकमकीच्या एक दिवस आधी, सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातून लष्कर-ए-तौयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सकाळी बडगामच्या चाडूरा भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली.