Photo Credit- X

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या एका रस्ते अपघातात जखमी झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या अपघातात सीआरपीएफचे १९ जवान जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. जखमी जवान सीआरपीएफच्या 181-एफ कंपनीचे होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ शहरातील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी नऊ जखमी जवानांना श्रीनगर शहरातील एसएमएचएस रुग्णालयात पाठवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांपैकी एकाचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे.

अति वेगाने वाहन चालवल्याने घाटीत अपघात होत आहेत. शुक्रवारी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील मम्मर भागात एका खासगी कारला तेलाच्या टँकरने धडक दिली, त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.

अधिका-यांनी सांगितले होते की, खाजगी कारचा चालक संथ गतीने चालणाऱ्या वाहनांच्या रांगेला ओव्हरटेक करत होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या तेलाच्या टँकरने कारला धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑइल टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. कारमधील इतर दोन जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना नंतर घरी सोडण्यात आले.