TV Channels निवडणे आता होणार आणखी सोपे, TRAI लवकरच लॉन्च करणार नवे App
TV Channels | (Photo Credits: File)

दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) अर्थाच ट्राय (TRAI) टीव्ही चॅनल ग्राहकांच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. डीटीएच (DTH) आणि केबलधारकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य ट्रायने यापूर्वीच दिले आहे. परंतू, काही कारणांनी हे स्वातंत्र्य घेताना ग्राहकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी ट्राय आता एका स्वतंत्र अॅपद्वारेच यावर तोडगा काढणार आहे. कंपन्यांकडून ग्राहकांना हवे ते चॅनेल्स न पुरवले जाण्याचे वारंवार घडणारे प्रकार, तसेच, कंपन्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सवर चॅनल निवडीची असलेली क्लिष्ट प्रक्रिया यामुळे ग्राहकाला नाहत त्रास सहन करावा लागतो. ट्रायच्या अॅपमुळे हा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे.

चॅनल निवडीबाबत ट्रायने नव्या धोरणाद्वारे सोपी प्रक्रिया ग्राहकांना उपलब्ध करुन दिली खरी. परंतू, कंपन्यांनी ट्रायच्या धोरणाकडे डोळेझाक करत ग्राहकांचा त्रास कायम ठेवला. त्यासाठी डीटीएच आणि केबल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चॅनल निवडीचे अधिकार दिले नाहीत. तसेच, ज्यांनी दिले त्या कंपन्यांनी चॅनल निवडीची प्रक्रिया इतकी क्लिष्ट करुन ठेवली. की, ग्राहकाचा गोंधळ उडाला. परिणामी ग्राहकांनी कंपन्या म्हणतील तेच पॅकेज विशिष्ट दराने घेणे पसंत केले.

कंपन्यांच्या चालबाजीला आळा घालण्यासाठी ट्रायने आता नवे पाऊल टाकले आहे. ट्राय आता एका नव्या अॅपची निर्मिती करतं आहे. या अॅपद्वारे ग्राहकाला आपल्या पसंतीचेच चॅनल निवडणे सोपे जाणार आहे. इतकेच नव्हे तर, या अॅपमुळे केबलचालकांच्या मुजोरगिरीलाही चांगलाच चाप बसणार आहे. (हेही वाचा, DTH चे बिल कमी येण्याची शक्यता, ट्राय कडून नवा नियम लवकरच होणार जाहीर)

प्राप्त माहितीनुसार, ट्रायने विविध कंपन्यांशी चर्चा करुन हे अॅप विकसीत करण्याचे ठरवले आहे. तसेच, ग्राहकांना डीटीएच कंपन्या किंवा केबल चालकांच्या अॅपपेक्षा ट्रायचे अॅप वापरण्यास खूप सोपे असणार आहे. या अॅपद्वारे ग्राहकांना त्यांच्या कंपनीद्वारे सर्व प्रकारचे चॅनेल्स मिळवता येऊ शकतील. चॅनल निवडीबाबात स्वतंत्र धोरण लागू केल्यानंतर ट्रायकडे डीटीएच कंपन्या आणि केबल चालकांविरुद्ध हजारो तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींमधून ट्रायच्या असे ध्यानात आले की, अनेक मोठ्या कंपन्या अद्यापही ग्राहकांना चॅनल निवडीचे स्वातंत्र्य देत नाहीत. या तक्रारींच्या निवारणार्थ ट्रायने अनेकदा सूचना करुनही कंपन्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे ट्राय आता नवे अॅप घेऊन येत आहे. हे अॅप लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.