TikTok Ban in India: टिक टॉक बंदीमुळे कंपनीचे होत आहे दिवसाला 3 कोटी रुपयांचे नुकसान; 250 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात
Tik Tok video app (Photo Credits: Wiki Commons)

जगभरात धुमाकूळ घालणारे 'टिक टॉक' (TikTok) मोबाईल व्हिडीओ अ‍ॅपवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. अपघातांची संख्या, तसेच यावर तयार होणारे अश्लील व्हिडीओ पाहता मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या अ‍ॅपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. याबाबत उद्या निर्णय होणार आहे, मद्रास हाय कोर्टाने 24 एप्रिलपर्यंत या अंतरिम बंदीवर ठोस निर्णय घेतला नाही तर टिक टॉक वरील बंदी उठवली जाईल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. याबाबत न्यायालय जो काही निर्णय घेईल तो घेईल, मात्र या बंदीमुळे भारतातील अनेक होतकरू लोकांचे वांदे झाले आहेत हे मात्र खरे.

'टिक टॉक' हे चीनची कंपनी Bytedance यांचे उत्पादन आहे. भारतामध्ये या अ‍ॅपचे फार मोठे मार्केट आहे, म्हणूनच हा बंदीचा फटका कंपनीला चांगलाच बसला आहे. टिक टॉक भारतातून बॅन झाल्यामुळे कंपनीचे दिवसाला तब्बल 3.50 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच यामुळे 250 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीने शनिवारी कोर्टामध्ये होत असलेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली. कंपनीने कोर्टात या अ‍ॅपवरील बंदी हटवण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा: अन्यथा टिक टॉक बॅन होईल रद्द, सुप्रीम कोर्टाने दिला मद्रास हायकोर्टाला अल्टिमेटम)

हे प्रकरण लवकर मिटवण्यासाठी नुकतीच कंपनीने तीन वर्षासाठी भारतात 100 कोटी डॉलर (सुमारे 7 हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच भारतात या वर्षीच्या शेवटी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या एक हजारापर्यंत वाढवणार आहे. यामध्ये 250 लोक अ‍ॅपवर अपलोड होणाऱ्या व्हिडीओजवर नजर ठेवलीत. अ‍ॅपवर जर चुकीचे व्हिडीओ अपलोड झाले तर ते ताबडतोब हटवण्यात येतील असे कंपनीने सांगितले आहे.