Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवण्याबाबत सरकारने नवीन नियम जारी केला आहे. आता जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन नियमानुसार, आता असे कार उत्पादक, ऑटोमोबाईल असोसिएशन आणि स्वयंसेवी संस्था (NGO) देखील तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात, ज्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उघडण्याचा परवाना आहे. या संस्था चालक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच परवाने देऊ शकतात. मात्र, वाहनांच्या नोंदणीसाठी (RC) आपल्याला आरटीओमध्येच जावे लागेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या संदर्भात नोटीस जारी केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्वीप्रमाणेच ड्रायव्हिंग लायसन्स जारी करत राहील. बुधवारी मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले होते की, 'कंपनी, असोसिएशन, फर्म, एनजीओ, कोणतेही युनिट किंवा खाजगी संस्था ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर उघडण्यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना निकष पूर्ण करावे लागतील.

त्यात पुढे म्हटले आहे की, या संस्था किंवा युनिट्समध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा असाव्यात. त्यांना केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 अंतर्गत सर्व आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. त्यांच्याकडे सुरुवातीपासून आतापर्यंत एक क्लीन रेकॉर्ड असावा. केंद्र सरकार अशी केंद्रे उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान देणार नाही, असेही यात म्हटले आहे. तर आता अशा केंद्रांनाही ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना काळापासून, देशातील जवळजवळ सर्व राज्यांच्या परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्याची पद्धत बदलली आहे. आता नवीन प्रणाली अंतर्गत, स्लॉट बुक करताच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतील. तुम्ही पैसे जमा करताच, तुमच्या सोयीनुसार परीक्षेची तारीखही उपलब्ध होईल.