
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एफडी (FD) वरील व्याजदरात 65 बेसिस पॉईंट्स पर्यंत वाढ केली आहे. आरबीआयने (RBI) ने नुकतीच रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर एसबीआयने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, बँकेने एफडीवरील व्याज 25 ते 65 बेसिस पॉइंट्सने वाढवले आहे. ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर करण्यात आली आहे. वाढलेले दर 13 डिसेंबर 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.
यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी बँकेने किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती. बँकेने 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्के केला आहे. अशा प्रकारे, त्यात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर 6.10 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. त्यात 75 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.
दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या रकमेवर व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता तो 6.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के झाला आहे. तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रकमेवर आता 6.10 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल. पाच वर्षे ते दहा वर्षांच्या रकमेवर व्याजदर 6.10 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. हे व्याजदर नवीन ठेवी आणि मॅच्युअर खात्यांच्या नूतनीकरणासाठी लागू होतील. (हेही वाचा: अपंग पाल्याच्या आई-वडिलांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा! अपंगत्व असलेलं अपत्य असल्यास मिळणार कर सवलत)
ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक 7 ते 45 दिवसांसाठी 3.5 टक्के, 46 ते 179 दिवसांसाठी 5 टक्के, 180 ते 210 दिवसांसाठी 5.75 टक्के, 211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.25 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी - 7.25 टक्के तर 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी 7.25 टक्के व्याज देत आहे. दरम्यान, बँकेने एसबीआय वेकेअर ठेव योजना (SBI WeCare FD Scheme) 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ TD विभागातील विद्यमान दरापेक्षा 50 बेसिस अधिक व्याज मिळेल. त्यांना आधीच सामान्य लोकांपेक्षा 50 बेसिस अधिक व्याजदर मिळत आहेत. म्हणजेच, या योजनेंतर्गत बँक सामान्य लोकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 100 बेसिस अधिक व्याज देत आहे.