Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिस केवीपी स्कीममध्ये 10 वर्षात पैसे दुप्पट, जाणून सुरक्षित गुंतवणूकीचा हा एक पर्याय
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

थेंबे थेंबे तळे साचे या नियामानुसारच पैसा साठवायचा असतो. पण आजकाल खाली वर जाणारे शेअर मार्केट, मोठ्या धोक्याची झालेली गुंतवणूक आणि एकरकमी मोठी रक्कम भरून जमिनी किंवा घरात हुंतवणूक करणं सार्‍यांनाच शक्य नसतं. म्हणूनच इतर सुरक्षित पर्यायांचा विचार करत असाल तर किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)हा एक पर्याय आहे. 10 वर्षांत यामध्ये पैसे दुप्पट होतात आणि ते सुरक्षित देखील आहे. दरम्यान याची जबाबदारी खुद्द केंद्र सरकार घेत आहे. गुंतवणूकीचा हा पर्याय दीर्घकाळ लाभ देणारा पर्याय आहे.

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र म्हणजेच केवीपी मध्ये गुंतवलेले पैसे आता 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होणार आहेत. कोणतीही व्यक्ती एक हजार आणि त्याच्या पटीत पैसे यामध्ये गुंतवू शकतात. सोबतच यामध्ये नामांकनाची सोय आहे. 2 प्रौढ व्यक्ती संयुक्त रित्यादेखील पैसे गुंतवू शकतात. केवीपी ही 1 हजार, 5 हजार, दहा हजार, पन्नास हजार अशा मुल्यांमध्ये उपलब्ध केल्या जातात.किमान गुंतवणूकीची सीमा 1 हजार आहे तर कमाल मर्यादा नाही. या गुंतवणूकीच्या पर्यायाची अधिक माहिती www.indiapost.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन मिळवू शकता.

केवीपीची विक्री डाक घर आणि मोठ्या बॅंकांद्वारा केली जाते. केवीपी सर्टिफिकेट जारी केल्यानंतर सुमारे दीड वर्षांनंतर पैसे काढता येऊ शकतात. तर या योजनेचा वापर करून तुम्ही आयकरात सूट मिळवू शकत नाही. पण त्यामुळेच पैसे काढताना टीडीएस कापला जाणार नाही.

आर्थिक वर्ष 2020 च्या दुसर्‍या तिमाही मध्ये केवीपी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम 113 महिने म्हणजे 9 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होत होते. मात्र व्याजात कपात झाल्याने मॅच्युरिटी डेट वाढवण्यात आली आहे.