Photo Credit- X

जागतिक व्यापारी तणाव (Gold Price Today) आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्याचा दर विक्रमी (Gold Hits Record High) पातळीवर पोहोचला. या अहवालाच्या वेळी, MCX वर सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅम 95,172 रुपये इतका होता, तर दरम्यानच्या काळात त्याने विक्रमी ₹95,435 चा टप्पा गाठला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या टॅरिफ्स आणि त्याला मिळालेल्या प्रत्युत्तरामुळे निर्माण झालेल्या व्यापार युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक सुरू केली.

सुरक्षीत गुंतवणुकीसाठी सोन्यात गुंतवणूक

भारतीय सराफा बजाराचे अभ्यासक सांगतात की, कमकुवत डॉलर, व्यापार युद्धाचे वाढते तणाव आणि जागतिक आर्थिक वाढीविषयी वाढती चिंता यामुळे सोन्याच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली आहे. गुंतवणूकदारांचा ओघ सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळला आहे. जागतिक बाजारातही सोन्याचा दर USD 3,300 प्रती औंस च्या पुढे गेला असून, जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे. (हेही वाचा, Gold And Silver Rate Today: भारतात सोने दर उच्चांकी पातळीवर; मुंबईत प्रतितोळा कसा? घ्या जाणून)

विद्यमान वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये 20% पेक्षा अधिक वाढ

सेंट्रल बँकांनी ETF च्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीने आणि सातत्याने सुरू असलेल्या भू-राजकीय तणावांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. अनिश्चिततेच्या काळात सोनं ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सार्वजनिक माहिती दर्शवते की 2025 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये 20% पेक्षा जास्त वाढ झाली असून मागील वर्षभरात सुमारे 40% वाढ नोंदवली गेली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे (WGC) भारतातील प्रादेशिक सीईओ सचिन जैन यांनी ANI शी बोलताना सांगितले, सोन्याची एक मालमत्ता वर्ग म्हणून मूलभूत स्थिती अजूनही खूप मजबूत आहे आणि वर्षभर ही स्थिती मजबूत राहील, असा आमचा विश्वास आहे.

जसजसे जागतिक व्यापार संघर्ष तीव्र होत आहेत आणि बाजारातील अस्थिरता वाढत आहे, तसतसे सोन्याच्या किमतींना पाठबळ मिळत आहे. विश्लेषकांच्या मते, 2025 मध्ये सोनं हे सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक साधन राहणार आहे.