Representational Image (Photo Credits: PTI)

ग्रामीण बँकांच्या परीक्षा या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या या परीक्षा देण्यासाठी केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र लवकरच या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता मराठी भाषेतूही या परीक्षा देण्याची संधी मराठमोळ्या उमेदवारांना उपलब्ध झाली आहे.

यापुढे बँकांच्या परीक्षा या मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिली. 'स्थानिक तरुणांना संधी आणि रोजगार मिळावा यासाठी बँकांच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार असून विभागीय ग्रामीण बँकांमधील अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या परीक्षांमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल,' असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ:

यापूर्वी बँकांच्या परीक्षा स्थानिक भाषेत घेतल्या जाव्यात अशी मागणी जोर धरु लागली होती. हा विषय ट्विटरवर देखील ट्रेंडमध्ये होता. प्रादेशिक भाषेत परीक्षा होत नसल्याने अनेक तरुण नोकरांपासून वंचित राहत होते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करत बँकांच्या परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.