CIDCO Lottery Result 2019 Winners List: मुंबईत स्वत:चे घर असावं असे स्वप्न उराशी बाळगून लाखो लोक मुंबईत येतात. कष्ट करुन आपला घाम गाळून पै न् पैन जमा करुन आपल्या स्वत:चे घर घेतात. मात्र मुंबईत सध्या घरांच्या किंमती पाहून आपले स्वप्न थोडे पाठीमागे ठेवलेल्या लोकांसाठी सुरु करण्यात आलेली सिडको लॉटरी म्हणजे एक वरदानच आहेत. तुमच्या बजेटमध्ये मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पुर्ण करणा-या सिडको घरांच्या लॉटरीचा निकाल आज जाहीर झाला. आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरु असलेल्या सोडतीमध्ये अनेक भाग्यवान विजेत्यांचे नशीब फळफळले. या लॉटरीमध्ये सिडको मास हाऊसिंग लॉटरी आणि स्वप्नपूर्ती योजना लॉटरी अशा 2 सोडत ठेवण्यात आल्या होत्या.
या सोडतीमध्ये सिडकोच्या 95 हजार घरांपैकी 9249 कुटूंबाना हक्काचा निवारा मिळाला. त्याचबरोबर यात जुन्या 810 घरांसाठी निकाल जाहीर करण्यात आला. या सोडतीचे सिडकोकडून खास युट्युब चॅनलवर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते.
सिडको कडून महाराष्ट्रात येत्या 5 वर्षांत दोन लाख घरं बांधली जाणार आहेत. यामधील 95 हजार घरे बांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील घरं टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दरवर्षी म्हाडा प्रमाणेच महाराष्ट्रात सिडकोकडूनही सामान्यांना परवडतील अशा दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले जातात. पुढे या घरांसाठी सोडत काढून त्यादिवशी भाग्यवंताची यादी जाहीर केली जाते.