7th Pay Commission: होळीच्या आधी 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालं डबल गिफ्ट; पगारात होणार मोठी वाढ
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

7th Pay Commission: कोरोना साथीचा मोठा परिणाम सरकारी कर्मचार्‍यांच्या खिशावर पडला आहे. तथापि, आता आर्थिक कामे सुरू झाल्याने सरकारचे उत्पन्न वाढले आहे. याचा फायदा केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्‍यांनादेखील मिळू लागला आहे. अलीकडेचं तेलंगणा सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना होळीच्या आधी मोठी भेट देत वेतनात 30% फिटमेंट बिलाची घोषणा केली. ही वाढ 11 व्या वेतन पुनरीक्षण आयोगांतर्गत (11th Pay Revision Commission) करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वयही 61 वर्ष करण्यात आले आहे.

तेलंगणा सरकारने आपल्या सर्व सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारामध्ये 30 टक्के फिटमेंटसह वाढीची घोषणा केली. तसेच सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 61 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी विधानसभेत यासंदर्भात जाहीर घोषणा केली. (वाचा - 7th Pay Commission: होळीनिमित्त मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट; सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत मिळणार 10 हजार रुपये एडवांस)

राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 9.17 लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होईल. करारावर नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना तसेच आउटसोर्सिंगच्या कर्मचार्‍यांनाही हा लाभ देण्यात येईल. या सर्वांचा पगार पुढील 1 एप्रिलपासून वाढविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षकांना पगाराच्या 30 टक्के फिटमेंट वाढविल्याची घोषणा केल्याने मला आनंद होत आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून होईल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे आणि वित्तीय तूटमध्ये अनपेक्षित वाढ झाल्यामुळे 11 व्या वेतन पुनरावलोकनास उशीर झाला आहे." गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तेलंगणा सरकारने राज्यभरातील सरकारी अध्यापन रुग्णालयांमधील शिक्षकांच्या पगारामध्ये वाढ केली होती. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा केंद्रासह अनेक राज्यातील कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्याने पगारही वाढतो. वास्तविक, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्याने किमान पगारामध्ये (Minimum Salary) वाढ होते.