New Railway Plan: भारतीय रेल्वेने नवीन प्लॅन जाहीर केला आहे. गोल्डन चतुर्भुज योजनेंतर्गत लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमधील स्लीपर कोच पूर्णपणे काढून टाकण्यात येणार आहेत. म्हणजेचं या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच राहणार आहेत. साधारणत: ज्या ट्रेनचा स्पीड ताशी 130/160 किमी प्रति तास असणार आहे, त्या ट्रेनमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. जेव्हा मेल आणि एक्सप्रेस गाड्या 130 किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावतात तेव्हा नॉन एसी कोच तांत्रिक अडचणी निर्माण करतात. त्यामुळे अशा सर्व गाड्यांमधून स्लीपर कोच हटवण्यात येणार आहेत.
सध्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 83 एसी कोच बसविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या वर्षाअखेरीस कोचची संख्या वाढवून 100 केली जाणार आहे. पुढील वर्षी रेल्वेतील कोचची संख्या 200 करण्याची योजना आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि कमी वेळ घेणारा असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत सामान्य एसी कोचपेक्षा भाडे कमी ठेवण्याचीदेखील योजना आहे. (हेही वाचा - आजपासून बदलले Railway Reservation चे नियम, प्रवासाच्या 5 मिनिटांपूर्वी करता येणार तिकिट बुक)
दरम्यान, एसी कोच नसलेल्या गाड्यांचा वेग एसी कोच असलेल्या गाड्यांपेक्षा कमी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा गाड्या ताशी 110 किमी वेगाने धावतील. हे सर्व बदल टप्प्याटप्प्याने केले जाणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने बुधवारी 39 नवीन प्रवासी गाड्या चालविण्यास मान्यता दिली. या सर्व गाड्या विशेष गाड्या म्हणून चालवल्या जातील. रेल्वेने सर्व रेल्वे गाड्यांची यादी जाहीर केली आहे. परंतु, आता या रेल्वे कधी धावतील याची माहिती देण्यात आलेली नाही. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, लवकरचं या 39 नव्या गाड्या रुळावर धावतील.
मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर दरम्यान 10 विशेष प्रवासी गाड्या धावतील. या गाड्यांमध्ये जनरल डब्बे असणार नाहीत. त्याऐवजी, या पूर्णपणे विशेष प्रवासी गाड्या असतील, ज्यामध्ये पुष्टी नसलेल्या तिकिटाशिवाय (विना कंफर्म तिकीट) प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
या गाड्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या इतर गाड्यांप्रमाणेच कोरोना विषाणूशी संबंधित सर्व नियमांचे पालन करावे लागेल. यामध्ये सामाजिक अंतर, स्वच्छता, मास्क इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय 17 ऑक्टोबरपासून खासगी तेजस गाड्यादेखील सुरू होतील. आयआरसीटीसीने बुधवारी याची घोषणा केली आहे. तेजस ट्रेनचे तिकिट बुकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. कोरोना कालावधी दरम्यान तेजस एक्स्प्रेस गाड्या 7 महिन्यांपासून बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, आता पुन्हा या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार या गाड्या 17 ऑक्टोबरपासून लखनऊ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई मार्गांवर पुन्हा सुरू होतील.