शेतकऱ्यांना मोठा दिलासा; यावर्षी समाधानकारक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit- Flickr)

भारतीय हवामान खात्या (IMD)ने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असून, एकूण सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल, त्यामुळे 93 टक्के पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. मात्र, आता हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचे म्हटले आहे.

यंदा अल निनोचा धोका असणार आहे, मात्र त्याचा प्रभाव कमी असेल. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून ते ऑगस्ट या काळात समप्रमाणात पाऊस पडेल. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये अल निनोमुळे कमी पाऊस पडला होता. (हेही वाचा: यंदाच्या वर्षात कमी पावसाची शक्यता, स्कायमेट हवामान खात्याचा अंदाज)

यंदा देशात सर्व साधारण पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान खात्याने वर्तवला होता. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांत राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.