केंद्र सरकारची बैठक (Photo Credit-ANI)

पुलवामा (Pulwama) येथे जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा भ्याड हल्ला केला. पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनांना थारा देते, पाठींबा देते यामुळे पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे. नुकतेच भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला आहे, त्यानंतर आता पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या सर्व मालावरची कस्टम्स ड्यूटी (Customs Duty), भारत सरकारने तब्बल 200 टक्क्यांनी वाढवली आहे. पाकिस्तानसाठी व्यापार क्षेत्रातला हा मोठा आघात मानला जात आहे, याचे परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच होतील.

पाकिस्तानमधून मुख्यत्वे फळे, सिमेंट, तेल, खनिजे अशा गोष्टी आयात केल्या जातात, मात्र आता या गोष्टींवरील कर महागणार आहे. 2017-18 मध्ये भारताने पाकिस्तानकडून 3,482.3 कोटी म्हणजेच  48.85 कोटी डॉलरच्या गोष्टी आयात केल्या होत्या. आता पाकिस्तानसोबत होणारे व्यवहार जवळजवळ बंद करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा : भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला)

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरला. या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले आहेत. या कृत्याचा निषेध करत, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकार काही ठोस पावले उचलत आहे. शुक्रवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे असे म्हटले आहे. दरम्यान पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्या सातही जणांकडे कसून चौकशी केली जात आहे.