International Women’s Day 2020: स्नेहा मोहन दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून केलं पहिलं ट्विट
Sneha Mohandas and Pm Modi (PC - Twitter)

International Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मागील आठवड्यात जागतिक महिला दिनानिमित्त आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे सोपवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आज स्नेहा मोहन दास (Sneha Mohandas) यांनी मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पहिलं ट्विट केलं आहे. स्नेहा दास या फूड बँकेच्या संस्थापक आहेत. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वत: विषयी माहिती दिली आहे.

या व्हिडिओद्वारे स्नेहा यांनी आपल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. स्नेहा मोहनदास यांनी 2015 मध्ये चेन्नेईमध्ये फूड बँकेची स्थापना केली होती. भारतात कोणीही भुकेला राहणार नाही, हा या फूड बँकेचा उद्देश आहे. त्या पुढे या व्हिडिओमध्ये सांगतात की, माझ्या आजोबांच्या जन्मदिनानिमित्त माझी आई मुलांना बोलावून त्याना जेवण देत असे. आईचं हे काम पुढे नेण्यासाठी मला फूड बँकेची कल्पना सुचली. त्यामुळे हा उपक्रम सुरु केला, असंही स्नेहा दास यांनी सांगितलं. (हेही वाचा - International Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, राजनाथ सिंह, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मल्लिक आदी दिग्गज नेत्यांनी 'जागतिक महिला दिन 2020' निमित्त दिल्या खास शुभेच्छा!)

स्नेहा दास यांनी 'फूड बँक चेन्नई' या नावाने फेसबूक पेज तयार केले आहे. या पेडच्या माध्यमातून त्या लोकांशी जोडल्या गेल्या आहेत. स्नेहा दास यांनी लोकांना आपापल्या राज्याच्या, शहरांच्या नावाने फूड बँकेचे पेज तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशात तब्बल 18 ठिकाणी फूड बँक सुरू झाल्या, असंही स्नेहा दास यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे स्नेहा दास या उपक्रमासाठी लोकांकडून दानस्वरुपात सामान गोळा करतात. त्यानंतर अन्न शिजवून ते गोर-गरिबांना वाटतात. त्यांच्या या उपक्रमाची दखल नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून मोदींच्या ट्विट अकाऊंटवरून पहिलं ट्विट करण्याचा मान स्नेहा दास यांनी मिळवला आहे.