पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

आयकर विभाग येत्या काही आठवड्यात इलेक्ट्रॉनिक पॅन कार्डच्या मदतीने काही मिनिटांतच पॅन कार्ड बनवून देण्यासाठी खास सोय उपलब्ध करून देणार आहे. आधार कार्डाच्या मदतीने अर्जदाराची माहिती घेऊन पॅन कार्डसाठी डिटेल्स तपासले जातील. त्याच्या माध्यमातून आता ई पॅन (ePAN) अवघ्या काही मिनिटांत आणि मोफत बनवणं शक्य होणार आहे. अशा प्रकारचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. यामुळे ज्यांचं पॅन कार्ड (PAN Card) हरवलं आहे त्यांच्यासाठी आता अवघ्या काही मिनिटांत नवं ड्युप्लिकेट पॅन कार्ड बनवलं जाणार आहे.

एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक पॅनसाठी आधार कार्डाचे डिटेल्स व्हेरिफाय करणं गरजेचे आहे. याकरिता एक ओटीपी क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डावर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अ‍ॅक्सेस दिला जाईल. त्यामुळे नव्याने कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही.

PAN जनरेट झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीने EPAN जारी केले जाणार आहे. यामध्ये एक QR कोड देखील दिला जाणार आहे.एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन धोकेबाजी आणि डिजिटल फोटोशॉपिंग रोखण्यासाठी आता क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती एन्क्रिप्ट केली जाणार आहे.

एका पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून आठ दिवसात सुमारे 62,000 हून अधिक ePAN जारी करण्यात आली आहेत. आता संपूर्ण देशामध्ये ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे आयकर सेवांमध्ये अधिक डिजिटलीकरण आणण्यासाठी असेल.