Rs 2000 Note India Latest News: 2000 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? गेल्या दोन वर्षापासून छपाई बंद असल्याची माहिती समोर
(File Photo)

काळ्या पैशांना लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने 2016 साली नोटबंदीचा (Demonetization) निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारने 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यापाठोपाठ 500 च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यासोबतच भारतीय बाजारपेठेतले सर्वात मोठे चलन म्हणून 2 हजार रुपयांची नोट (Rs 2000 Note) बाजारात आणली होती. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्षात 2 हजार रुपयांची एकही नवी नोट छापली नाही. त्याच बरोबर बँकेकडून दोन हजारच्या नोटेचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे. त्यामुळे आता 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारपेठेतून हद्दपार होणार की काय? अशी भिती नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार, देशात गेल्या दोन वर्षात एकही 2 हजाराची नोट छापली गेली नाही. विशिष्ट किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सल्लामसलत करून घेत असते. तसेच मागणीनुसार बाजारात नोटांचा पुरवठा ठेवला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षात म्हणजेच 2019-20 आणि 2020-21 मध्ये दोन हजाराची एकही नोट छापली गेलेली नाही, असेही अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- देशात Coronavirus चा संसर्ग वाढला; PM Narendra Modi यांनी 17 मार्च रोजी बोलावली मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

पीटीआयचे ट्वीट-

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये 6 लाख 72 हजार 642 कोटी रुपये किंमतीच्या दोन हजारच्या नोटा बाजारात आल्या होत्या. मात्र, 2019 मध्ये हे प्रमाण 6 लाख 58 हजार 119 कोटींवर आले. तर, 2020 मध्ये यात आणखी घट झाली. या काळात दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण 5 लाख 47 हजार 952 कोटींवर आले आहे. त्यानुसार, देशात गेल्या दोन वर्षात बाजारातून 1 लाख 10 हजार 247 कोटी रुपये मुल्याच्या दोन हजारच्या नोटा कमी झाल्या आहेत.