PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

देशातील वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. असे सांगितले जात आहे की 17 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान मोदी कोरोनाची वाढती प्रकरणे आणि लसीकरणावर भर देण्याबाबत चर्चा करतील. यावेळी पंतप्रधान मोदी कोरोनाची लढाई आणि लसीकरण मोहिमेवर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय घेतील. पीएम मोदी 17 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. कोरोनाचा प्रादुर्भावसोबतच पंतप्रधान मोदी देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

अशा परिस्थितीत पंतप्रधान राज्यांमधील लसीकरणाची प्रगती व त्यातील अडचणींचा आढावा घेतील. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे वाढली आहेत. गेल्या 24 तासांत देशात 26 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे आढळून आली असून, त्यापैकी 78 टक्के प्रकरणे या पाच राज्यातील आहेत. त्याचबरोबर यापैकी 63 टक्के पेक्षा जास्त प्रकरणे केवळ महाराष्ट्रात आढळली आहेत.

आकडेवारीनुसार, 85 दिवसांनंतर देशात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी 24 तासांत 26,624 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होत्ती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विषाणूमुळे 118 रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर देशात मृतांचा आकडा 1,58,725 झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम वेगवान करावी अशी केंद्राची इच्छा आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत देशात तीन कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. (हेही वाचा: मध्य प्रदेश सरकारकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर, महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना 7 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार)

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायांकडे लोकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रकरणे वाढत आहेत. ते म्हणाले की, 80 टक्के पेक्षा जास्त प्रकरणे काही राज्यातील आहेत.