देवाची करणी: दुचाकीला धडक बसल्याने फ्लायओव्हरवरून खाली पडली तरुणी, त्यानंतर जे घडले (Video)
फ्लायओव्हरवरून खाली पडली तरुणी (Photo Credtis Youtube)

दिल्ली: अपघातामध्ये उंचावरील फ्लायओव्हरवरून पडूनही तरुणी आश्चर्यकारकरित्या जिवंत राहिली असल्याची घटन दिल्लीमध्ये घडली आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्ली येथील विकासपुरी फ्लायओव्हर (Vikaspuri Flyover) वर आपल्या दुचाकीवरून ही तरुणी जात होती. यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली आणि तरुणी खाली कोसळली, मात्र ही तरुणी जिवंत आहे. उंचावरून पडल्यामुळे तिला फक्त फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून जात होती. हे तिघे पश्चिम विहार येथून जनकपुरीकडे प्रवास करीत होते. विकासपुरी फ्लायओव्हरवर आल्यावर एक दुचाकी त्यांच्या अगदी जवळून गेली, ज्यामुळे दुचाकीचा तोल जाऊ लागला. याचवेळी भरधाव वेगात असणाऱ्या एका चारचाकीने त्यांचा दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, ही मुलगी हवेत फेकली गेली आणि फ्लायओव्हरवरुन खाली पडली. तिचे दोन्ही मित्र बॅरिअरला धडकून जखमी झाले. (हेही वाचा : Rolls Royce अंगावर कोसळून मेकॅनिकचा मृत्यू, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

ही मुलगी फ्लायओव्हरवरून खाली पडतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने ही जेव्हा खाली पडली तेव्हा रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. खाली पडल्याबरोबर आसपासच्या लोकांनी तिला हॉस्पीटलमध्ये भरती केले. प्राथमिक उपचारानंतर तिला सोडण्यात आले आहे.