1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. पार पडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेले निर्णय यांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. निर्माणाधीन घरांवरील (under-construction flat) जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला आहे तर सवलतीच्या घरांवरील (Affordable housing ) जीएसटी 5 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आणला आहे. चला पाहूया या 1 एप्रिलपासून काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग
या गोष्टी होणार स्वस्त –
> घर खरेदी – 1 एप्रिलपासून घरांच्या जीएसटीच्या दरांमध्ये बदल होणार आहेत, तसेच सीमेंट वगळता बाकी वस्तुंवरील जीएसटी स्लॅब कमी केला आहे. त्यामुळे घर खरेदी स्वस्त होईल.
> जीवन विमा – 1 एप्रिलपासून जीवन विमा खरेदी करणे स्वस्त होणार आहे. या नव्या बदलाचा फायदा 22 ते 50 वर्ष वयोगटाला होणार आहे.
> कर्ज घेणे - बॅंकांमध्ये एमसीएलआर ऐवजी आरबीआय रेपो रेट आधारावर लोन मिळणार आहेत. यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकते. तसेच व्याजदरही घटू शकतो.
> बुकिंग रिफंड – तुम्ही रेल्वेचे तिकीट काढले असेल, मात्र काही कारणास्तव तुमची ट्रेन चुकली तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात. अन्यथा तुम्ही त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करू शकता.
> ईपीएफओ ट्रान्सफर – नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ईपीएफओसाठी अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार
> केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे.
> नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.
या गोष्टी होणार महाग –
> कार खरेदी – 1 एप्रिलपासून जवळजवळ सर्वच कार निर्माण कंपन्यांचे कार तयार करण्याचे पार्टस महागणार आहेत, त्यामुळे कार खरेदीही महागणार आहे.
> सीएनजी गॅस – 1 एप्रिलपासून सीएनजी गॅसच्या किमतीमध्ये 18 % वाढ होणार आहे. त्यामुळे गाडी चालवणेही महागणार आहे. (हेही वाचा: एप्रिल महिन्यात बदलणार 'या' गोष्टी,कोणत्या आहे ते जाणून घ्या)
> घरगुती गॅस - 1 एप्रिलपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व सोसायटी अथवा कॉम्प्लेक्समधील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.