कॉलेज ऍडमिशन फॉर्म मध्ये निवडता येणार  'मानवता ' धर्माचा पर्याय, पश्चिम बंगाल मधील ५० कॉलेजांचा निर्णय
West Bengal College to Allow students To Choose Humanity As Religion (Photo Credits: File Photo)

कोलकाता: पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील कोलकाता व अन्य लगतच्या शहरातील जवळपास 50 कॉलेजांनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन फॉर्म मध्ये आपला धर्म न सांगण्याची मुभा दिली आहे.यानुसार धर्माच्या रकान्यात विद्यार्थ्यांना मानवता, धर्मनिरपेक्षता, निधर्मता किंवा अज्ञेयवादी असे पर्याय यापुढे निवडता येणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना निदान शैक्षणिक संस्थेत आपली धार्मिक विचारसरणी उघड करण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश असल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती, त्याकडे लक्ष देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम बंगालच्या अनेक कॉलेजमधील विदयार्थ्यांनी कॉलेजच्या प्रवेशअर्जात धर्मांच्या रकान्या पुढे "आम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही" असे लिहिले होते.ही बाब लक्षात घेऊन कॉलेजने या विद्यार्थ्यांना मानवता हा पर्याय धर्माच्या रकान्यात भरण्यासाठी उपलब्ध करून दिल या पाठोपाठ राज्यातील काही अन्य धार्मिक संस्थांनी यामध्ये धर्मनिरपेक्षता, निधर्मता व अज्ञेयवादी हे पर्याय देखील सामील करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आता कोलकाता मधील मौलाना आझाद कॉलेज, राममोहन कॉलेज, बंगबासी मॉर्निग, महाराजा श्रीचंद्र कॉलेज (आंदूल, जि.हावडा), मिदनापूर कॉलेज यांनी धर्मासाठी ‘मानवता’ हा पर्याय दिला आहे. यानंतर देखील काही विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी मानवता ऐवजी मानवतावाद असा पर्याय देण्याची मागणी केली आहे. कायदेशीर लढाई जिंकून यूवक झाला नास्तिक; मिळाले ‘नो कास्ट, नो रिलीजन, नो गॉड' सर्टिफिकेट

 

या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत करत हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हंटले आहे. याबाबत बोलताना समाजशास्त्र शाखेचे शिक्षण घेत असणार समय सेनगुप्ता सांगतो की, "आम्ही अनेक विद्यार्थी धर्माचे पालन अगदी निष्ठेने करतो पण ही आमचे ओळख असू शकत नाही. शिवाय कोणताही धर्म हा वैयक्तिक निवडीवर आधारित असणे आवश्यक आहे या विचारला पाठिंबा देणारा कॉलेजचा निर्णय हा नक्कीच कौतुकास्पद आहे."