नाशिक (Nashik) महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याचा (School Reopen) निर्णय घेण्यात आला आहे, येत्या 13 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवी शाळा सुरू होणार आहेत. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता अखेर शाळा सुरू करण्यात येणार आहे. शहरातील 506 शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजताना दिसणार आहे. शाळेबाहेर मुलांचा किलबिलाट होताना पाहायला मिळणार आहे. नियमांचे पालन करून शाळा सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण
मनपा तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांची संख्या ४२७३ इतकी असून, त्यापैकी ४२७० इतक्या शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. यामुळे शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण झाल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. तसेच कोवीडचा प्रादुर्भाव न झालेल्या शाळांची संख्या २८१ इतकी आहे.
ग्रामीण भागात पहिलीपासून शाळा सुरु झाली असली तरी महत्वाच्या शहरांमधील पहिलीपासूनचे वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन उद्या किंवा 15 तारखेऐवजी शाळा नवीन वर्षातच सुरु करा, अशी मागणी शिक्षक-पालकांकडून केली जातेय. मुंबई, पुण्यासारख्या शहरात 15 डिसेंबरपासून तर नाशिकमधील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 23 डिसेंबर ते 1 जानेवारी अशी नाताळची सुट्टी असते. त्यामुळे 15 तारखेला शाळा सुरु केल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी लागेल. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरु करण्याची मागणी शिक्षक आणि पालकांनी केली आहे. (हे ही वाचा Nashik Crime: नाशिकमध्ये शस्त्रे बाळगल्या प्रकरणी 7 पुजारी अटकेत, देशी बनावटीचे पिस्तूल, विळा, चाकू आणि हॉकी स्टिक जप्त.)
औरंबादेतील शाळा कधी सुरु होणार?
औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबत उद्या निर्णय होणार आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्या सकाळी 11 वाजता शाळा सुरु करण्यासंदर्भात बैठक होणार आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरला शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असं आस्तिक कुमार पांडे म्हणाले होते. आता औरंगाबाद शहरातील कोरोना स्थिती सामान्य असल्यामुळे शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.