Competitive Exam Guide: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ UPSC परीक्षांसाठी राबवणार विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम
Competitive Exam Guide | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन: स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करु पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) आता आता केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) घेत असलेल्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करत आहे. चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळावी. यूपीएसी (UPSC) मध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढून त्यांना देशातील उच्च पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे, असा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.

विद्यापीठाशी सल्लग्न महाविद्यालयांध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर उपस्थित होते. (हेही वाचा, NEET Exam Pattern 2020: मेडिकल कॉलेज प्रवेश मिळण्यासाठी जाणून घ्या 'नीट' परीक्षा फॅक्टर)

कशी असेल अभ्यासक्रमाची रचना?

नियमित पदवी अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतात.

अभ्यासक्रमांतर्गत प्रतिदिन 2 तास मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक लिखाण कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञांशी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांवर मार्गदर्शन

पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांवरील मार्गदर्शन

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश?

अभ्यासक्रमाचे यंदा पहिलेच वर्ष आहे. पहिल्याच वर्षी या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीसंख्या 40 इतकी निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, प्रवेशासाठी इयत्ता 12 बोर्ड परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. अधिक मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यी, पालक आणि इच्छुकांना माहिती आणि प्रवेश अर्ज http://unipune.ac.in/cec/default.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.