
इंजिनिअरींगला अॅडमिशन मिळवण्यासाठी पूर्वी बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय असणं बंधनकारण होतं. मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (All India Council for Technical Education) ने नवं धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार आता इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं बंधनकारक नाही. AICTE च्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, यामुळे गुणवत्ता घसरेल अशी चिंता तज्ञ व्यक्त करत आहेत.
ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) 2021-22 या वर्षासाठी एक हॅन्डबुक जाहीर केलं आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स या विषयांपैकी कोणतेही तीन विषय असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसंच सामान्य विद्यार्थ्यांना 45 टक्के आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 टक्के गुणांच्या आधारावर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे.
AICTE च्या या निर्णयामुळे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी यापूर्वी असलेला PMC विषयांचा आग्रह निवळला आहे. तसंच प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या टक्केवारी देखील घट करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत दिलासा मिळाला आहे. मात्र या नव्या निर्णयावर काही घटकातून नाराजीही व्यक्त केली जात आहे.